गुवाहाटी / 26 जुलै 2023 : आसाममध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाने पत्नीसह सासू-सासऱ्यांची हत्या केल्याची घटना आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे. हत्या केल्यानंतर 9 महिन्यांच्या मुलासह आरोपीने पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्ह्याची कबुली दिली. नजीबूर रहमान असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचा प्रेमविवाह झाला होता. मात्र त्यांच्यात काही कारणातून मतभेद झाले आणि त्यांच्या नात्याचा अखेर करुण अंत झाला.
नजीबूर आणि त्याची पत्नी संघमित्रा यांचे लॉकडाऊनच्य काळात फेसबुकवर प्रेमसंबंध जुळले. यानंतर दोघांनी कलकोत्यात पळून जाऊन लग्न केले. मात्र यानंतर संघमित्रांच्या आईवडिलांनी तिला घरी परत आणले. त्यानंतर वर्षभरानंतर आई-वडिलांनी तिच्याविरोधात चोरीचा आरोप करत फिर्याद दाखल केली. यानंतर संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडी झाली. तुरुंगातून आल्यानंतर संघमित्रा पुन्हा नजीबूरसोरबत चेन्नईला पळून गेली.
यानंतर जेव्हा ते परतले तेव्हा संघमित्रा गरोदर होती. मग दोघेही नजीबूरच्या घरी राहू लागले. त्यानंतर संघमित्राला मुलगा झाला. मात्र मुलगा चार महिन्यांचा झाल्यानंतर संघमित्रा पतीचे घर सोडून माहेरी गेली. त्यानंतर तिने नजीबूरवर छळवणूक केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नजीबूरला तुरुंगात पाठवले.
जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नजीबूर पुन्हा संघमित्राच्या घरी बाळाला भेटायला गेला. मात्र संघमित्राच्या घरच्यांनी त्याला भेटू दिले नाही. यानंतर नजीबूरच्या भावाने संघमित्रा आणि तिच्या कुटुंबीयांवर नजीबूरवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. सोमवारी दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नजीबूरने संघमित्रा आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली. यानंतर स्वतः पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केले.