बदलापूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधील मांजर्ली येथे घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करत, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. अनिता विश्वकर्मा असे मयत पत्नीचे नाव आहे. तर ओमप्रकाश विश्वकर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे मांजर्ली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका काय वाद झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.
मांजर्ली परिसरातील दिव्यज्योत अपार्टमेंटमध्ये विश्वकर्मा कुटुंबीय राहते. गेल्या काही दिवसांपासून दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. सोमवारी संध्याकाळी दोघेही पती-पत्नी एकत्र दारु प्यायला बसले होते. यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा काही कारणातून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद व्हायचे याबाबत अद्याप कळू शकले नाही. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.
अंबरनाथ पूर्व भागातील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्समधील साई लीला लॉजमध्ये एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत.