छपरा : हल्ली सोशल मीडियाचं फॅड खूप वाढलं आहे. सोशल मीडियाचे फायदे असले तरी तोटेही भरपूर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील छपरा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीची मुलाशी मैत्री झाली. दोघेही एकमेकांसोबत चॅट करु लागले. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मग दोघांनी पळून जाऊन लग्नही केले. पण लग्नानंतर मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. जे सत्य उघडकीस आले त्यानंतर डोळ्यावरील आंधळ्या प्रेमाची पट्टी बाजूला झाली. कारण तिने ज्याच्याशी लग्न केले होते, तो मुलगा नसून मुलगी होती. पोलिसांनी कलम 164 अन्वये जबाब नोंदवून दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
गुरुग्राममधील एका मुलीची फेसबुकच्या माध्यमातून बिहारमधील सारण जिल्ह्यातील मुलाशी मैत्री झाली. मग रोज दोघांमध्ये चॅटिंग,कॉलिंग सुरु झाले. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तीन महिन्यांनी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण घरुन या लग्नाला मिळणार नाही म्हणून दोघांनी पळून जाण्याचे ठरवले. विशेष म्हणजे दोघेही अल्पवयीन होते.
ठरल्याप्रमाणे दोघेही घरुन पळाले आणि कानपूरमध्ये एकत्र भेटले. तेथून दोघेही मुंबईला आले. मुंबईत दोघांनी मंदिरात लग्न केले आणि तिथेच राहू लागले. तरुणाने मुंबईत नोकरी बघितली. पण लग्नाचा आणि संसाराचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण लग्नानंतर मुलीला आपल्या जोडीदाराचे सत्य कळले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा पती पुरुष नसून मुलगी होता. यानंतर दोघीही छपरामध्ये आले. त्यांचे कुटुंबीय त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी दोन्ही मुलींचा जबाब नोंदवत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.