छपरा : उत्तरेकडील राज्यांमध्ये महिलांचा हुंड्यासाठी छळ होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. बिहारमध्ये बुलेट दिली नाही म्हणून विवाहितेची अमानुष छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीच्या रोजच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली. सारण पोलीस ठाण्याअंतर्गत जोगनिया काठी परिसरात ही घटना घडली. महिलेच्या पित्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. आरोपी सतत मद्यपान करायचा आणि पत्नीला देखील मद्यपान करण्यासाठी जबरदस्ती करायचा. महिलेने या गोष्टींना विरोध केल्यास तिला मारहाण करायचा. पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला वैतागलेल्या विवाहितेने अखेर स्वतःचे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.
दीपा गुप्ता असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेला जीवन संपवण्यास प्रवृत्त करणारा तिचा पती राहुल गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. दीपाचे वडील दीपक कुमार यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दीपा आणि राहुल या दोघांचे लग्न मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून जमले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेचच राहुल हा दीपाकडे बुलेट गाडीची मागणी करीत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर दीपाच्या पतीसह सासरच्या कुटुंबातील सर्वजण फरार झाले होते. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी राहुल गुप्ता हा दारूच्या नशेत दररोज पत्नी दीपा हिला बेदम मारहाण करायचा. एवढेच नव्हे तर तो दीपाला जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडायचा. दीपा कृत्याचा प्रतिकार करायची. घटनेनंतर पोलिसांनी तिचा मृतदेह छपरा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविछेदनानंतर मृतदेह दीपाच्या माहेरच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.