पटना : पती शहरात रहायला तयार नाही म्हणून पत्नीने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील पटनामध्ये घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर सहा महिन्यांच्या मुलाला घेऊन पत्नी फरार झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पप्पू कुमार असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
पटना येथील कविता हिचा विवाह गौरीचक येथील पप्पू कुमार याच्याशी 2021 मध्ये झाला होता. मात्र कविताला गावात रहायचे नव्हते. त्यामुळे तिने लग्नाच्या दिवशीच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
यानंतर वरात माघारी गेली. मात्र त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी समाजाच्या मदतीने हे नाते पुन्हा जोडले आणि मुलीला सासरी पाठवले. मात्र सासरी गेल्यानंतर ती पतीवर पटना शहरात राहण्यासाठी दबाव टाकत होती. यावरुन दोघांमध्ये भांडणे होत होती.
नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. यानंतर रात्री पती झोपल्यानंतर कविताने उशीच्या सहाय्याने पतीचे नाक दाबून त्याची हत्या केली आणि सहा महिन्यांच्या मुलाला घेऊन फरार झाली. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
महिलेने आधी पतीला नशेचे पदार्थ खाऊ घातले आणि मग हत्या केली असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सर्व प्रकार उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी पत्नीचाही पोलीस शोध घेत आहेत.