जमुई : सुट्टीनिमित्त गावी आलेल्या तरुणाची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना बिहारमध्ये घडली. तरुणाला कुणाचा तरी फोन आला आणि तरुण घरुन निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच हाती लागला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमुई जिल्ह्यातील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील आचार्यदिह गावात ही घटना घडली. तरुणाचा मृतदेह त्याच्या घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या केंदुआ अहार येथे सापडला. तरुणाच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले आहेत. सत्येंद्र कुमार असे मयत तरुणाचे नाव असून, तो बेंगळुरू येथे कंत्राटदार म्हणून काम करत होता. पाच दिवसांपूर्वी त्याच्या घरी आला होता. तरुणाचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.
सत्येंद्रला काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुणाचा तरी फोन आला. यानंतर सत्येंद्र गावात जाण्यासाठी निघाला. त्यानंतर तो रात्री घरी परतलाच नाही. मग सकाळी केंदुआ अहार येथे त्याचा मृतदेहच सापडला. सत्येंद्रचा मृतदेह पाहून कुटुंबाव दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी रामडीह गावाजवळ सिकंदरा-नवाडा रस्ता चक्का जाम करून गुन्हेगारांच्या अटकेची मागणी सुरू केली. सुमारे अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना शांत केले. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवला.
सत्येंद्रला कुणाचा फोन आला होता?, तो कुणाला भेटायला गेला होता?, त्याची हत्या कोणत्या कारणातून झाली? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. तपासानंतरच या हत्येमागे कोण आहे हे स्पष्ट होईल.