औरंगाबाद : बहिणीच्या नणंदेवरच तरुणाचा जीव जडला. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र भावोजीचा याला विरोध होता. याच कारणातून संतापलेल्या मेव्हण्याने भावोजीचा काटा काढल्याची घटना बिहारमधील औरंगाबादमध्ये घडली आहे. भावोजीने त्याची बहिण दिली नाही, म्हणून तरुणाने आपल्याच बहिणीचा संसार उद्धवस्त केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुनील राम असे हत्या करण्यात आलेल्या भावोजीचे नाव आहे. संतोष राम असे आरोपी आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष रामचे आपल्या बहिणीच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यान त्याचे बहिणीच्या नणंदेशी सूत जुळले. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते, त्यामुळे ते पळून गेले. पण घरच्यांनी दोघांना पकडून घरी परत आणले. भावोजीचा या नात्याला विरोध होता. याचबाबत भावोजी आणि बहिण संतोष रामच्या घरी आले होते. यावेळी रात्री संतोषने भावोजीला भरपूर दारु पाजली आणि मग त्याची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृताच्या पत्नीने चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. आरोपींध्ये संतोषसह त्याच्या तीन मित्रांचा सहभाग आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ संतोष आणि पती मुनील रात्री उशिरा घरी आले. सकाळी पत्नी मुनीलला उठवण्यास गेली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नीने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मयत मुनीलच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.