चंद्रपूर / 5 ऑगस्ट 2023 : चंद्रपूरमध्ये चड्डी बनियान गँग सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या गँगचे सदस्य कैद झाले आहेत. पोलिसांच्या विविध पथकांनी या संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडिओची शहानिशा केली. या घटनेनंतर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता नागरिकांची सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रपूर शहरातील एका ख्यातनाम शाळेतील सीसीटीव्हीत हा धक्कादायक व्हिडिओ चित्रित झाला आहे.
काल सकाळी शाळेतील कर्मचारी शाळेत आले तेव्हा सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यामुळे कर्मचाऱ्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. शाळेने तात्काळ चंद्रपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. पहाटेच्या सुमारास चड्डी बनियान टोळीचे सदस्य शाळेच्या इमारतीत फिरताना सीसीटीव्हीत आढळून आले. चड्डी बनियान टोळीचे सदस्यांच्या तोंडावर मास्क आणि अंगावर मोजकेच कपडे होते.
या टोळीने नागपूर मार्गावरील शाळेच्या इमारतीसह आसपासच्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये देखील घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलिसांच्या विविध पथकांनी या संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडिओची शहानिशा केली आहे. आंध्रप्रदेशातील चड्डी बनियान टोळीशी या सदस्यांचे काही साधर्म्य आहे की हा अन्य कुठला चोरीचा प्रकार याबाबत पडताळणी केली जात आहे. दरम्यान, चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.