राज्यातील महिला आणि तरूणींवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेनंतर रोज प्रत्येक जिल्ह्यामधून अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. अशाताच पुण्यातील घोरपडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील आरोपी अल्पवयीन मुलाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या आईने यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावरून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडी येथे हा सर्व प्रकार मार्च 2024 ते मे 2024 यादरम्यान घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. लहान चिमुकल्यांपासून तरूणी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकही शाळेमध्ये आपल्या मुलींना पाठवण्यासाठी घाबरू लागले आहेत. समाजात अशा घटना घडत असल्यामुळे कोणाच्या मनात कधी काय येईल अन् आपल्या मुलीचे एखादार नराधम लचके तोडेल अशी भीती पालकांच्या मनात येत आहे.
अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमधील अनेक आरोपी पीडितेच्या ओळखीचेच निघाले. त्यामुळे आपली मुलगी सोशल मीडिया वापरत असेल तर ती कोणाच्या संपर्कामध्ये आहे? कोणासोबत बोलते, भेटते, बाहेर जाते? या सर्व गोष्टींवर पालकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावर या घटनांमध्ये मोठे माध्यम ठरू लागले आहे. त्यामुळे पोलीस पालकांना त्यांच्या मुलांसोबत मोकळेपणाने बोला आणि त्यांना चांगल्या वाईटाबद्दल माहिती द्या, असं आवाहन करत आहेत.
दरम्यान, बदलापूरच्या घटनेनंतर अनेक शाळांमध्ये पोलिसांनी गुड टच आणि बॅड टच असे उपक्रम घेतले. त्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी हिंमत करत आपल्या वर्गशिक्षकांना त्यांच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यामुळे पालकांनीही घरीच मुलांना काही गोष्टी विश्वासात घेत समजून सांगायला हव्यात. जेणेकरून त्यांची मुलगी कोणत्याही अत्याचाराची बळी ठरणार नाही.