ग्वाल्हेर : प्रेमात आंधळी झालेल्या अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या आईचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींनी आधी महिलेला चाकूने भोसकले. मात्र तरीही ती जिवंत असल्याने त्यांनी तिला गळा आवळून ठार केले. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत घराचा दरवाजा बंद दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना बोलावले आणि दरवाजा उघडून पाहिले असता घटना उघडकीस आली.
आरोपी अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या आईला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तिला मुलीचा प्रियकरही पसंत नव्हता. यामुळे ती मुलीच्या प्रेमाला विरोध करत होती.
दोन महिन्यांपूर्वी मुलगी प्रियकरासोबत पळूनही गेली होती. तेव्हा मुलीच्या आईने तिच्या प्रियकराविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेत तिला आईच्या ताब्यात दिले. तर तिच्या प्रियकराला तुरुंगात डांबले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्या. मुलीची लगातार तिला विरोध करत होती. यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा कट रचला.
मुलीने प्रियकरासोबत मिळून आधी आईवर चाकूहल्ला केला. त्यानंतरही ती जिवंत असल्याने दोघांनी मिळून तिचा गळा आवळून तिला ठार केले. यानंतर दोघेही तेथून फरार झाले. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत महिलेचा दरवाजा बंद दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला.
शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता महिलेचा मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
महिलेची मुलगी फरार असल्याने पोलिसांना तिच्यावर पहिला संशय आला. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत मुलीला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी मुलीची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.
यानंतर पोलिसांनी मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपींकडून गु्न्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.