दोघेही नातेवाईकाच्या लग्नाला आले होते, जुने भांडण विकोपाला गेले, मग साडूच साडूसाठी काळ ठरला !

| Updated on: May 15, 2023 | 3:09 PM

नातेवाईकाच्या घरी लग्न होते. सर्व नातेवाईकांसह दोघे साडूही लग्नाला गेले होते. पण लहान साडूला पाहून मोठ्या साडूचा जुना राग उफाळून आला. मग ऐन लग्नात शोककळा पसरली.

दोघेही नातेवाईकाच्या लग्नाला आले होते, जुने भांडण विकोपाला गेले, मग साडूच साडूसाठी काळ ठरला !
जुन्या वादातून साडूने साडूला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी : नातेवाईकाच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाची त्याच्या साडूनेच जुन्या भांडणातून हत्या केल्याची धक्कादायक घटना इगतपुरीत घडली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, हत्या केल्यानंतर तो फरार झाला आहे. सिन्नर फाटा येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत शिंदे असे 29 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालयाबाहेर मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करत आक्रोश केला. मयत हा टिटवाळा येथील रहिवासी असून, इगतपुरीत आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला आला होता. लग्न सोहळा आटोपून पुन्हा टिटवाळा येथे जायच्या तयारीत असताना अनिकेतचा मोठा साडू संदीप शांताराम निकाळे याने जुन्या भांडणाची खुरापत काढत त्याची हत्या केली.

दोघा साडूंमध्ये जुना वाद होता

अनिकेत आणि संदीप यांच्यात अनेकदा वादविवाद झाले होते. रविवार मध्यरात्री संदीप आधी आपला भाऊ विशाल शांताराम निकाळे, अमोल पवार यांच्यासोबत दारु प्यायला. दारु प्यायल्यानंतर त्याने अनिकेत साडूचा खुन करायचा आहे, असे सांगून इतर दोघांना त्याला बोलवण्यास सांगितले. त्यानुसार अनिकेत ह्यास फोन लावून घोटी सिन्नर फाटा येथे बोलावून घेतले. त्यास सुरवातीला सासरची बाजू का घेतो, माझी बाजू का घेत नाही म्हणत हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात अनिकेत याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने अधिक रक्तस्त्राव झाला.

हत्येनंतर आरोपी फरार

हत्या केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच अनिकेतचा मेहुणा गणेश जगताप आणि मित्राने घटनास्थळी जाऊन अनिकेतला घोटी ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. यानंतर लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी रुग्णल्यात गर्दी करत आक्रोश केला. याबाबत गणेश देवीदास जगताप यांच्या फिर्यादीनुसार घोटी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संदीप निकाळे घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत आहे.

हे सुद्धा वाचा