सांगली / शंकर देवकुळे : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर – कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा अजब फतवा पोलीस प्रशासनाने परिसरातील टपरी धारकांना दिला आहे. एका टपरी चालकाने केलेल्या कृत्याची शिक्षा सर्वांना मिळाली आहे. परंतु सर्वच टपरीधारकांना भरउन्हात हातात काठी घेवून उभे रहावे लागत आहे. चूक एकाची आणि शिक्षा सर्व टपरीधारकांना का? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय चौकातील टपरीधारकांसाठी जीवघेणा ठरु शकतो. हा प्रकार म्हणजे जखम मांडीला अन इलाज डोक्याला असाच आहे.
यामुळे टपरीधारकांवर तोंड दाबून बुक्कयांचा मार सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, लवकरात लवकर हा प्रकार थांबवावा असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी दिला आहे.
आठवड्याभरापूर्वी कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था आठवड्यात दोन वेळा खंडित झाली. याची पाहणी केली असता एका टपरीचालकाने ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेची तार तोडल्याचे निदर्शनात आले. कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेच्या तारा तोडण्याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाने इस्लामपूर पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी शहा नामक व्यक्तीवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या व्यक्तीची पानपट्टी चौकातून हटवण्यात आली आहे.
परंतु या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने सदर परिसरात सर्व टपरीधारकांना टार्गेट केले आहे. ट्रॅफिक सिग्नल परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कामेरी नाका चौकालगत असणार्या टपरी धारकांना पाचारण केले आहे. दररोज दोन टपरीधारकांनी थांबून वाहतूक व्यवस्था सुरळीत
करण्याचा पोलीस प्रशासनाने आदेश दिला आहे.
टपरीचालकही पोलिसांच्या आदेशाला विरोध करुन कायमचा पोटावर पाय येण्यापेक्षा एक दिवस वाहतूक व्यवस्थेसाठी भरउन्हात उभा राहून स्वतःची सुटका करताना दिसत आहे. पण वाहतूक व्यवस्थित करताना टपरीधारकांना काही इजा पोचली तर त्याला जबाबदार कोण असा अनुत्तरीत प्रश्न समोर आहे.