झाशी : प्रयागराज येथे उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. राजु पाल हत्याकांडातील उमेश पाल हे महत्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचीही हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी माफिया अतिक अहमद, त्याची पत्नी शाइस्ता, मुलगा असद, शूटर गुलाम, बॉम्ब फेकणारा गुड्डू मुस्लिम यांच्यासह सुमार बाराहून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यातील प्रमुख आरोपी असद, गुलाम आणि गुड्डू मुस्लिम यांना प्रयागराज पोलिस शोध घेत होते. यातील दोन जणांना पोलिसांनी याआधीच चकमकीत ठार केले आहे. मात्र, यातली महत्वाचा असलेला शार्प शुटर याचाही पोलिसांनी आज एन्काउंटर केला आहे.
उमेश पाल हत्याकांडात उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत या हत्याकांडात सहभागी असलेल्या विजय चौधरी आणि अरबाज यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. तर, आज प्रमुख आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद यालाही पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. असद याच्यासोबत त्याचा आणखी एक साथीदार शूटर गुलाम ही या चकमकीत मारला गेला आहे.
यूपी एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि गुलाम हे दोघेही झाशीजवळील बारागाव आणि चिरगाव दरम्यान लपून बसले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एसटीएफ पथकाने परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबवली. एसटीएफने असदला आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्याने उलट दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात असद आणि गुलाम हे ठार झाले.
पोलिसांनी मृत असद आणि गुलाम यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अत्याधुनिक विदेशी शस्त्रे, ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर ४५५ बोअर, वाल्थर पी ८८ पिस्तूल ७.६३ बोअर असा शस्त्र साठा आढळून आला. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच या दोघांकडे दुचाकीही सापडली आहे.
डेप्युटी एसपी नवेंदू, डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली यूपी एसटीएफ टीमने ही कारवाई केली. या टीममध्ये नवेंदू कुमार, विमल कुमार, उपनिरीक्षक अनिल कुमार सिंह, निरीक्षक ज्ञानेंद्र कुमार राय, उपनिरीक्षक विनय तिवारी, मुख्य हवालदार पंकज तिवारी, कमांडो अरविंद कुमार, कमांडो दिलीप कुमार यादव यांचा समावेश होता.
दरम्यान, या हत्याकांडातली चार शार्प शुटर यांचा एन्काउंटर केल्यानंतर आता पोलीस अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबीर या तीन शार्प शूटर्सचा शोध घेत आहेत.