कल्याण / 14 ऑगस्ट 2023 : उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा घेऊन कल्याणमध्ये विक्रीसाठी आलेल्या चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. सूरज राजगुरू, राहुल मांजरे, साजन अहिरे, देवकिसन कुमारिया अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौघेही नागपूर आणि येवला येथील रहिवासी आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस गुन्हेगारांवर कडक वॉच ठेवून आहे. यादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी हा गावठी कट्टा कुणाला किती रुपयांत विकणार होते, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सध्या या आरोपींवर ठाणे आयुक्त मनाई आदेशानुसार घातक शस्,त्र अग्निशस्त्रे जवळ बाळगण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण बाजारपेठ पोलिसांना चार जण गावठी कट्टा विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वल्लीपिर परिसरात पोलिसांनी सापळा रचला. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींपैकी तीन जण येवल्याचे रहिवासी आहेत, तर एक जण नागपूरचा रहिवासी आहे. आरोपी यूपीतील वाराणसी येथून 10 हजार रुपयात गावठी कट्टे विकत घ्यायचे आणि मुंबईत येऊन 80 हजाराला विकायचे.
मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार साळवी यांना गुप्त माहिती मिळाली आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपींनी आतापर्यंत असे गावठी कट्टे विकले?, कुणाला विकले? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. कल्याण झोन 3 डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि बाजारपेठ पोलीस स्थानकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रुपवते, पोलीस पावसे, बाविस्कर, बाबुल, तातकडे यांच्या पथकाने कल्याणच्या वल्लीपिर रोड परिसरात सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या.