तिरुअनंतपुरम : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून तरुणीच्या वडिलांची शेजाऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिग्नू, जिजिन, श्याम आणि मनू अशी हल्लेखोरांची नावे आहेत. राजू असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपींनी आधी तरुणीवरही हल्ला केला. तरुणीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. गुरुवारी सकाळी हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र त्याआधीच ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणीचा आणखी एक नातेवाईकही जखमी झाला आहे.
आरोपी जिग्नू याने दोन वर्षांपूर्वी राजू यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र राजूला दारु आणि ड्रग्ज व्यसन होते. तसेच त्याने शिक्षणही पूर्ण केले नव्हते. तर तरुणी सायन्समध्ये मास्टर झाली होती. यामुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. याचाच आरोपींच्या मनात खदखदत होता. यानंतर मुलीचे तिच्या सुयोग्य तरुणाशी लग्न ठरवण्यात आले होते.
तरुणीचे गुरुवारी सकाळी लग्न होणार होते. आदल्या दिवशी बुधवारी लग्नाच्या सर्व विधी आटोपले आणि घरचे दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी करत होते. इतक्यात शेजारचे चार तरुण लग्नघरात घुसले. त्यांनी आधी वधूवर हल्ला केला, मग वधूच्या वडिलांच्या डोक्यावर वार केले. यावेळी मुलीची आई बचावासाठी मध्ये आली असता हल्लेखोरांनी तिलाही जखमी केले. मदतीसाठी आलेल्या नातेवाईकालाही आरोपींनी मारहाण केली.
जखमी अवस्थेत मुलीच्या वडिलांना रुग्णालयात नेत असताना आरोपींनी त्यांचा पाठलागही केला. मात्र रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असले तरी पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही.