लातूर : जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तीन हजार रुपयांवरुन झालेल्या वादातून सावकाराच्या बेदम मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गिरीधारी तपघाले असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे सावकारी जाचाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गरीबांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून चक्रीव्याजाने पैसे वसुल केले जातात. कुटुंबाच्या प्रमुखाची हत्या झाल्याने त्यांची तीन मुले,पत्नी आणि वृद्ध आई भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.
रेणापूर येथील गिरिधारी तपघाले या जुराने गावातल्याच एका व्याजीबट्टी करणाऱ्या लक्ष्मण मरकड या व्यक्तीकडून कौटुंबिक गरजेपोटी तीन हजार रुपये घेतले होते. तीन हजार रुपयाचे चक्रदरवाढ व्याजाप्रमाणे आरोपी लक्ष्मण मरकड हा वीस हजार रुपये मागत होता. यावरून मरकड आणि तपघाले यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपीने गिरिधारी याला बेदम मारहाण करीत जखमी केले. जखमी झालेल्या गिरिधारी याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पुढील कार्यवाही सुरुवात केली आहे.
रेणापूर पोलिसांनी आता या पीडित कुटुंबाला दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे संरक्षण दिलेले आहे. निव्वळ तीन हजार रुपयांचे वीस हजार रुपये वसूल करायचे या हेतूने आरोपीने मारहाण केल्याचा तपघाले कुटुंबियांचा आरोप आहे. ज्या दिवशी गंभीर दुखापत झाली, त्या अगोदरही आरोपीने मयत गिरीधारी यांना मारहाण करीत हात मोडला होता. त्यानंतर गिरीधारी यांनी याची कल्पना पोलिसांना दिली होती.
लातुरच्या शासकीय दवाखान्यात उपचार घेऊन पाच दिवसांनी घरी परतल्यावर पुन्हा आरोपीने गिरीधारी यांना बेदम मारहाण केली. उपचारा दरम्यान गिरीधारी तपघाले यांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी लक्ष्मण मरकड आणि त्याच्या भाच्याला अटक केली आहे. ही घटना कळल्या नंतर निषेधार्थ अनेक संघटनांनी लातुरसह विविध ठिकाणी निदर्शने केली आहेत. अनेक कार्यकर्ते तपघाले यांच्या पत्नी व मुलांना भेटून धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.