दारू पिऊन त्या नशेत मुलीला आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारूड्या जावयाचा, त्याच्याच सासू-सासऱ्यांनी बसमध्येच काटा काढला. ही धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला. संदीप शिरगावे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जावयाचा जीव घेणाऱ्या आरोपी सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. संदीपची हत्या करून त्याचा मृतदेह बसस्थानकावर फेकून संशयित आरोपींनी पळ काढला होता. यामुळे कोल्हापूरमध्ये अतिशय खळबळ निर्माण झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी हनुमंतअप्पा काळे आणि गौरवा काळे या दोघांना अटक केली आहे. गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटी प्रवासात खून करून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संदीपचा मृतदेह बसस्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी बसस्थानक गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या बसस्थानक आवारातील एस.टी. प्रोव्हिजन या दुकानाच्या कट्ट्यावर एक अनोळखी तरूण बेशुद्धावस्थेत आढळला. तेथील लोकांनी पोलिसाना याबाबत कळवल्यानतंर शाहूपूरी पोलिस स्टेशनमधील अधिकारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी तपासणी केली असता तो तरूण मृत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या गळ्यावर व्रण होते, त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नव्हे तर गळा आवळून केलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले. मृत इसमाच्या शर्टाच्या खिशात एक डायरी व किल्ली सापडली. त्यावरून तपास केले असता मृताचे नाव संदीप शिरगावे असल्याचे समजले, डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबरही होता. पोलिसांनी तिला संदीपबद्दल माहिदी देऊन त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
सीसीटीव्हीवरून सापडले मारेकरी
या हत्येची तपासणी करत असताना पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा बुधवारी रात्रीच्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीपला त्या बसस्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवताना दिसून आले.
पोलिसांनी संदीपच्या पत्नीशी संपर्क साधला. संदीपला दुकानापाशी ठेवणारे त्याचे सासू-सासरा असल्याते समोर आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले होते.अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मुलीला त्रास देत असल्याने केली जावयाची हत्या
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हनुमंतअप्पा काळे आणि गौरवा काळे यांनी गुन्हा कबूल केला. काळे यांच्या मुलीचा करूणाचे, संदीपसोबत लग्न झाले पण तो दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो वारंवार करूणाला त्रास द्यायचा. त्यांचा घटस्फोटही झाला होता.मात्र संदीपचे त्रासदायक वर्तन कायम होते. तो करूणाला आणि तिच्या मुलालाही त्रास द्यायचा. अखेर या छळाला वैतागून सासू-सासऱ्यांनी त्याची समजूत काढू असे सांगत कोल्हापूरला जाण्याचा बहाण्याने बसमध्ये बसवले. नंतर प्रवासादरम्यान त्याची गळा आवळून हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह एसटी स्टँडवर ठेवून दिला.