शहडोल : इलाजाच्या नावाखाली तीन महिन्यांच्या मुलीला गरम सळीचे तब्बल 51 चटके दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चटके दिल्याने मुलीची तब्येत आणखी बिघडली असून, तिच्यावर शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक आहे. डाग दिल्याने याआधीही अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. डाग देण्याच्या प्रथेविरोधात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही हे अंधश्रद्धेचं भूत उतरताना दिसत नाही.
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील आदिवासी भागात आजारी पडल्यानंतर डाग देण्याची कुप्रथा अनेक वर्षांपासून सुरु आहे. एका तीन महिन्यांच्या मुलीला न्यूमोनिया झाला असून, श्वसनाचाही त्रास होत होता.
मुलीला बरं करण्यासाठी नातेवाईकांनी इलाजाच्या नावाखाली एक दोन वेळा नव्हे तब्बल 51 वेळा चटके दिले. मात्र यानंतरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, उलट चटके दिल्याने तब्येत आणखी बिघडली.
यानंतर कुटुंबीयांनी मुलीला शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये नेले. मुलीची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
ही कुप्रथा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही असे प्रकार उघडकीस येत आहेत. या कुप्रथेमुळे अनेक बालकांचे जीव गेले.