नागपूर / सुनील ढगे : झोपडीच्या जागेवरुन झालेल्या वादातून शेजाऱ्यानेच महिलेची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रामबाग परिसरात घडली आहे. आरती निकोलस असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तर बादल कुमरे असं आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. मयत महिला आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून, त्यांच्यात आधीपासूनच वाद होते.
नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झोपडीच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपी बादल आणि मयत आरती हे रामबाग परिसरात झोपडपट्टीत राहतात. दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. बादलच्या पत्र्याच्या घराचं सिमेंट काँक्रिटमध्ये बांधकाम सुरू आहे. यासाठी तो शेजारी राहणाऱ्या आरतीच्या घराची जागा भिंत बांधण्यासाठी मागत होता.
आरतीने त्याच्या घराची थोडी जागा आपल्या घरामध्ये घेतल्याचा बादलचा आरोप होता. यातूनच त्या दोघांमध्ये भांडण सुरु झाले. सकाळी झालेलं भांडण दुपार झाली तरी मिटलं नव्हतं, उलट अधिकच चिघळत गेलं. यानंतर बादलने चाकू काढला आणि सपासप आरतीवर वार करत आरतीला गंभीर जखमी केलं.
जखमी आरतीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमामवाडा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बादलला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.