नागपूर / 3 ऑगस्ट 2023 : नागपुरात चोरीच्या घटना थांबवतच नाहीत. दररोज चोरीचे सत्र सुरुच आहे. अशीच एक खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. दोघे चोरटे दुकानात आले आणि केवळ 25 सेकंदात सव्वा कोटी लुटून पसार झाले. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी पोलीस करत आहेत.
इतवारी बाजार परिसरात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी दुकानात आले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडून 1.15 कोटी रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाले. अवघ्या 25 सेकंदात हा सर्व प्रकार घडला. बाजारात वर्दळ असूनही कुणालाच काही कळलं नाही. ते आले ऐवज लुटून निघून गेले. लूट केल्यानंतर दोन्ही विमानाने नागपूरहून पुण्याला निघून गेले.
व्यापाऱ्याने लकडगंज पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा ओळख पटवली. यानंतर दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक केली. चोरीच्या या कटात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, भर बाजारात घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.