पाटणा : कुणाला व्यंगत्वावरून हिणवू नये, असा संदेश सामाजिक पातळीवर वेळोवेळी दिला जातो. मात्र हा संदेश कोण किती गांभीर्याने घेते हा प्रश्नच आहे. पाटण्यात एका दिव्यांग व्यक्तीची हत्या झाली, त्यामागे त्या व्यक्तीचे व्यंगत्व कारण होते. पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पती दिव्यांग आहे हे आवडेनासे झाल्यानंतर परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने दिव्यांग पतीची हत्या केली. मगन यादव असे हत्या झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. मगन हा नेहमीप्रमाणे दुकानात गेला होता. त्यावेळी दुकानात आलेल्या दोघांनी मगनवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पाटण्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पाटणा येथील खुसरुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहीम चक गावात 13 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार करून मारेकरी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून हत्याकांडाचा छडा लावण्यात यश मिळवले. मगनच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून मगनची गोळ्या झाडून हत्या घडवून आणली. या प्रकरणात पोलिसांनी मगनची पत्नी सोनी देवी व तिचा प्रियकर सूरज कुमार उर्फ उदय यादव या दोघांना अटक केली आहे.
सुरुवातीला हत्याकांडातील सहभाग नाकबूल करणाऱ्या सूरज कुमारने पोलिसांच्या दणक्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून या घटनेत वापरण्यात आलेल्या देशी बनावटीच्या कट्ट्याशिवाय एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. तसेच आणखी एका आरोपीला पकडण्यासाठी छापासत्र सुरु ठेवले आहे.
दिव्यांग दुकानदार मगन यादवची पत्नी सोनी देवी आणि तिचा प्रियकर सूरज कुमार यांनी हत्येचा कट रचला होता. सोनी देवी हिला मगन हा दिव्यांग असल्यामुळे आवडेनासा झाला होता. याचदरम्यान सोनीचे बारहमधील पंडरक येथील सूरज कुमारसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघे लग्न करण्याच्या तयारीत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मगनला मिळाली होती. त्याने तीव्र विरोध सुरु केल्यानंतर सोनीने मगनचा काटा काढण्याचा निश्चय केला होता. त्याच कटानुसार सुरजने दुसऱ्या मित्रासोबत 13 मे रोजी भरदिवसा मगनच्या दुकानात जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.