नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : गरबा खेळू न दिल्याच्या रागातून एका तरुणाने तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील रबाळे (Rabale, Navi Mumbai) येथे घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाश जयस्वाल असे मयत तरुणाचे नाव आहे. रबाळे पोलिसांनी (Rabale Police) आरोपी तरुणाला अटक केली आहे.
वेडेवाकडे कृत्य करणाऱ्या तरुणाला रबाळे एमआयडीसी भागात नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यास तिघांनी मज्जाव केला होता. याचाच राग आरोपीच्या मनात सळसळत होता. याच रागातून आरोपीने तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जितेंद्र पटवा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा वेडेवाकडे नाचत होता. दुर्गादेवी समोर असला नाच न करण्याचे सांगितल्यानंतरही वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले होते. हाच राग मनात ठेऊन आरोपीने मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांना मला दांडीया का खेळू दिला नाही असा जाब विचारत त्याच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.