झुंझुनू / 21 ऑगस्ट 2023 : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना राजस्थानमधील झुंझुनू शहरात घडली आहे. बंटी वाल्मिकी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. बंटी झुंझुनू नगर परिषदमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तो आपल्या पत्नीसह पिंपली चौक परिसरात राहत होता. पतीची हत्या करुन अज्ञातांनी त्याला मारल्याचा बनाव पत्नीने केला. मात्र तिचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी तिला अटक केली आहे. बंटीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शनिवारी बंटी घरी होता. यावेळी तो फोनवर एका महिलेशी बोलत होता. यावरुन बंटी आणि त्याची पत्नी कविता यांच्यात वाद झाला. या वादातून कविताने बंटीच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात बंटी जखमी होऊन जमिनीवर पडला. डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी कविताने युक्ती केली. पतीचा मृतदेह पाहून जोरजोरात ओरडायला सुरवात केली. यानंतर अज्ञातांनी पतीवर हल्ला केल्याचा बनाव केला.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. कविताने सांगितल्याप्रमाणे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र त्यात कोणत्याही संशयित व्यक्ती आढळून आल्या नाहीत. अखेर पोलिसांनी डॉग स्क्वॉड बोलावले. हत्येत वापरलेल्या बॅटचा वास घेतल्यानंतर कुत्रा कविताच्या समोर जाऊन उभा राहिला. यानंतर पोलिसांनी कविताला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
कविता आणि बंटी 15 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना तीन मुलं आहेत. 2012 मध्ये बंटी झुंझुनू नगरपरिषदेत सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाला. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध सुरु होते. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद होत होते.