झालावाड : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी जयपूरहून आपल्या गावी आलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळल्याने झालावाड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तरुणाचा मृतदेह दुसऱ्या गावातील विहिरीत आढळला. त्यामुळे तरुणांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. लग्नाला अवघे दहा दिवस बाकी असतानाच हा प्रकार घडला आहे. रणजीत राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. तरुणाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या आरोपावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत तरुणाचे 3 मे रोजी लग्न होणार होते. तरुणाच्या घरामध्ये लगीनघाई सुरू होती. रणजीत हा जयपुरमध्ये चांगल्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या इच्छेनुसार वधू देखील मिळाली होती. सर्व नातेवाईकही त्याच्या लग्नाच्या तयारीत होते. याचदरम्यान अचानक रणजीतच्या मृत्यूची बातमी धडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रणजीत हा मंगळवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता.
मागील तीन दिवसांपासून त्याचे कुटुंबीय तसेच गावकरी त्याचा सर्वत्र शोध घेत होते. आज सकाळी सारोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनोडा गावाजवळील एका विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. तेथील स्थानिक गावकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून तो रणजीतचा असल्याची ओळख पटवली.
रणजीतला अज्ञात मारेकर्यांनी जीवे मारून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून अज्ञात मारेकऱ्यांना अटक करावी, अशी आग्रही मागणी रणजीतच्या नातेवाईकांनी केली. याच मागणीवर अडून बसलेल्या नातेवाईकांनी रणजीतचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासही अटकाव केला होता.
यादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिरंजीलाल मीना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर रणजीतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.