सांगली : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील शिराळा तालुक्यातल्या बेलदारवाडी या ठिकाणी घडला आहे. पत्नी झोपत असताना पतीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली आहे. स्वाती प्रकाश शेवाळे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
स्वातीचे वडिल आजारी असून सध्या कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे स्वाती आणि प्रकाश दोघे पती-पत्नी शुक्रवारी तिच्या वडिलांना पाहण्यासाठी कोल्हापूर येथे रुग्णालयात गेले होते.
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर जेवून रात्री नेहमीप्रमाणे पत्नी स्वाती झोपलेली असताना प्रकाश याने तिचा गळा आवळला. यात स्वातीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पती फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.