माढा, सोलापूर / 9 ऑगस्ट 2023 : असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी युगुल काहीही करायला तयार असतात. सोलापुरातील माढा तालुक्यात प्रेमासाठी एका तरुणीने जे केले ते पाहून पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपले प्रेम मिळवण्यासाठी मुलीने स्वतःच्या वडिलांनाच अपंग करण्याचा प्लान आखला आणि तो प्रत्यक्षात उतरवलाही. वडिलांना अपंग केल्यास ते आपल्यामागे पळापळ करु शकणार नाही, असे तिला वाटल्याने प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केले. माढा शेटफळ मार्गावरील वडाचीवाडी गावानजीक घडली आहे. जखमी वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी माढा पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मुलगी साक्षी शहा,चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयुर चंदनशिवे, राम पवार, आनंद उर्फ बंड्या जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत.
साक्षी शहा हिचे अनेक वर्षापासून चैतन्य कांबळे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. साक्षी बारामती येथए एमबीएचे शिक्षण घेत आहे, तर चैतन्य माढा येथे केकचे दुकान चालवतो. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करुन संसार थाटायचा होता. मात्र साक्षीच्या वडिलांचा याला विरोध होता. यामुळे साक्षी आणि चैतन्यने मिळून वडिलांना अपंग करायचा प्लान केला. वडिलांचे पाय कापल्यास ते बेडवर पडून राहतील, अधिक पळापळ करणार नाहीत, त्यामुळे आपल्याला पळून लग्न करता येईल, असा विचार करत साक्षी आणि चैतन्यने हा प्लान केला.
साक्षी वडिलांसोबत कारने पुण्याहून शेटफळला येत होती. यावेळी वडाचीवाडी गावाजवळ येताच साक्षीने टॉयलेटला झाली सांगून गाडी थांबवली. यावेळी साक्षी टॉयलेटला गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे चार जण त्यांच्या गाडीजवळ आले. चौघांनी शहा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी शाह यांना माढा येथील पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. माढा पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करत तपास सुरु करण्यात आला.
पोलिसांनी मुलगी साक्षीला याबाबत विचारले घेतला असता दरोड्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी जेव्हा चौकशीसाठी तिला बोलावले तेव्हा मात्र ती पोलिसांची दिशाभूल करु लागली. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच मुलीने सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. माढा पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आतच प्रकरणाचा छडा लावून साक्षीसह तिचा प्रियकर आणि चौघे हल्लेखोर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व आरोपींविरोधात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.