भोपाळ, नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली जामतारा (Jamtara) नावाची वेब सिरीज खूपच गाजत आहे. ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणे हा पूर्ण गावाचाच मुख्य व्यवसाय असल्याचे यामध्ये दाखविण्यात आलेले आहे. मात्र हरियाणा, यूपी आणि राजस्थानच्या ठगीनीं जामतारा टोळीला देखील यामध्ये मागे टाकल्याचे समोर आले आहे. भोपाळसह मध्यप्रदेशातील विविध शहरांमध्ये या तीन राज्यातील ठग सक्रिय असून ते ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करतात. राजधानीच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या अटकेतून हे उघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी सात टोळ्यांतील 23 ठगबाजांना अटक केली आहे. बहुतांश आरोपी हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील आहेत.
यापूर्वीही सायबर पोलिसांनी नोकरीच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून फसवणूक करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक केली होती. या सेक्सटोर्शन टोळीतील सदस्य राजस्थानमधील अलवर, भरतपूर आणि हरियाणातील मेवात येथील असून, त्यांची फसवणूक करण्याची पद्धत वेगळीच आहे. हे ठगबाज आधी तरुणीचा फोटो व्हाट्स ॲपवर टाकतात. त्यानंतर फोनवर अश्लील संभाषण करतात आणि ते संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात. याशिवाय तरुणींसीबतचे अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात आणि नंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतात.
जामतारा टोळीचे लोक बहुतांश बँकेशी संबंधित फसवणूक करतात, अशी माहिती आरोपींनी चौकशीदरम्यान दिली. म्हणजेच ते OTP मागून फसवणूक करतात, पण कालांतराने लोकांमध्ये जागृती आली आणि त्यांनी OTP देणे बंद केले.
OTP बद्दल आता अनेकांमध्ये सजगता आली आहे, त्यामुळे ठगबाजांनी आता सेक्सटॉरशनचा विकृत पर्याय निवडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात ब्लॅकमेल होणारे पोलिसात तक्रारही करत नाहीत.