झांसी : पती-पत्नीच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो. पण हा विश्वासच तुटला तर नात्यात दरी निर्माण होते. मग हळूहळू नातं विस्कटतं. कधी कधी हे नातं जीवघेणा ठरतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा विश्वासघात केला. यातून दररोज दोघांमध्ये वाद होत होते. या वादातून अखेर जे घडलं त्याने पाच मुलं आईच्या मायेला पोरकी झाली. पतीने आधी चिकनमधून पत्नीला गुंगीचं औषध दिलं मग बेशुद्ध अवस्थेत तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. झांसीतील प्रेमनगर प्रेमनगर परिसरात ही घटना घडली. पत्नीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत, त्याचा शोध सुरु केला आहे.
संजील रायकवार हा पत्नी रेखा रायकवार आणि पाच मुलांसह राहत होता. संजीवचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. रेखाला याची माहिती होताच त्यांच्यात दररोज वाद होऊ लागले. शनिवारीही संजयने घरी चिकन बनवले आणि वहिनीला भेटायला तिच्या घरी गेला. रेखाला ही बाब कळल्यानंतर ती ही तिथे गेली. तेथे त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर ते दोघे घरी आले आणि पुन्हा भांडू लागले. मग रेखा आपल्या खोलीत निघून गेली. यानंतर संजीवने नशेचे औषध चिकनमध्ये घातले.
चिकन खाल्ल्यानंतर काही वेळात रेखा बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर संजीवने रेखावर चाकूने वार केले आणि तेथून पळून गेला. नातेवाईकांनी रेखाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.