बलरामपूर : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नवजात बालकाच्या जन्मानंतर नर्सने 2100 रुपये शकुन मागितला. मात्र बालकाच्या पालकांनी केवळ 500 रुपये दिल्याने रुग्णालयातील संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी बाळाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच गोंधळ केला. यानंतर डीएमने चौकशीचे आदेश दिले आहेत.
बेलवा सुलतानजोत येथील रहिवासी मनोजच्या पत्नीला प्रसव वेदना सुरु झाल्याने तिला जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची नॉर्मल प्रसुती झाली. बालकाच्या जन्मानंतर रुग्णालयातील नर्सने मनोजकडे 2100 रुपये शकुनच्या स्वरुपात मागितल्याचा मनोजचा आरोप आहे.
मनोजने नर्सला 500 रुपये दिले. मात्र नर्सने 500 फेकून दिले आणि तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी बालकाची तब्येत बिघडली. मनोजने सदर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले. मात्र कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. कुणीही बालकावर उपचार करण्यासाठी पुढे आले नाही.
बालकाची तब्येत अधिक बिघडली आणि यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर नातवाईकांना रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.
मृत बालकाच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सर्व आपबीती सांगितली. प्रकरणाच्या चौकशीसाठी सीएमओच्या अध्यक्षतेखाली तपास समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती 24 तासात प्रकरणाचा तपास करुन रिपोर्ट देईल. यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.