लखनौ : सध्या सर्वत्र लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात झालेल्या एका लग्न सोहळ्यामध्ये आनंदावर विरजण पडले आणि घडलेल्या हत्याकांडाने लग्न सोहळ्यावर शोककळा पसरली. दोन तरुण लग्न मंडपातून रसगुल्ल्याची बादली घेऊन पळत होते, त्यावेळी वधूच्या काकाने त्यांना रोखले. त्यावरुन वाद होऊन त्याचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या वधूच्या काकाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. भर लग्न मंडपात झालेल्या या राड्याने मैनपूर परिसरात खळबळ उडाली आहे. कुरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकापूर गावात ही घटना घडली. या घटनेचा स्थानिक पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
लग्न मुहूर्तावर पार पडले आणि वधू-वर एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भोजन समारंभही आटोपत आला होता. यादरम्यान लग्नमंडपातील रसगुल्ल्याची बादली दोघे तरुण पळवून नेत असल्याचे वधूच्या काकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पुढे होऊन त्या दोघांना रोखले आणि बादली मंडपातून बाहेर घेऊन न जाण्याची तंबी दिली.
सर्वांदेखत आपला अपमान झाला, या रागाने ते दोन तरुण संतापले. त्यांनी स्वतःची चूक मान्य न करता उलट वधूच्या काकाला बेदम मारहाण सुरू केली. विशेष म्हणजे हा वाद सुरू असताना त्यामागील कारण काय याचा अंदाज न घेताच वऱ्हाडातील इतर मंडळींनीही वधूच्या काकाची धुलाई केली. त्यात गंभीर दुखापत होऊन वधूच्या काकाचा मृत्यू झाला.
रणवीर सिंह असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते आपला मेहुणा रामकिशोरसोबत साडूच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले होते. रणवीर आणि रामकिशोर या दोघांनी लग्न मंडपामध्ये ज्या दोन तरुणांवर चोरीचा संशय घेतला, ते तरुण गावातीलच रहिवासी होते. त्यामुळे लग्न मंडपात वाद झाल्यानंतर अजय आणि रजत या दोन तरुणांच्या बाजूने गावकरी उभे राहिले.
वाद वाढत गेल्यानंतर तरुणांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या गावकऱ्यांनी वधूच्या काकाला बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या रामकिशोरवर सैफई येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.