एटा : संपत्तीच्या हव्यासातून मोठ्या भावानेच लहान भावाच्या कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील एटा येथे घडली आहे. घटनेनंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. भाऊ आणि वहिनीची चाकूने वार करत तीन वर्षाच्या पुतण्यावर हातोड्याने वार केला. सुदैवाने मुलगा यातून बचावला आहे. जितेंद्र असे हत्या करण्यात आलेल्या छोट्या भावाचे तर पंकज असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. आई लहान भावाला अधिक हिस्सा देईल या भीतीतून आरोपीने लहान भावाला कायमचा संपवण्याचा कट रचला.
पंकज आणि जितेंद्रच्या वडिलांची पाच एकर जमीन आहे. तर आईला तिच्या माहेरुन वारसा हक्काने आलेली 7 एकर जमीन आहे. वडिलांची जमिनीचा दोघा भावांना अडीच-अडीच एकर हिस्सा देण्यात आला होता.
आईचे लहान भावाकडे झुकते माप असल्याने तिच्या नावे असलेली 1 कोटी 80 लाख रुपयांची 7 एकर जमिन ती त्यालाच देईल, अशी भिती आरोपीला होती. यातूनच त्याने भावाचा काटा काढण्याचा कट रचला.
पंकजने यासाठी आपल्या खाटीक मित्राला 5 लाख रुपयांची ऑफर दिली. सोमवारी सकाळी पंकज मित्रासह जितेंद्रच्या घरी पोहचले. मात्र जितेंद्र घरी नव्हता. बेडरुममध्ये जितेंद्र पत्नी आणि मुलगा झोपले होते.
आरोपींनी त्याच्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. मग मुलावर हातोड्याने वार केले. यानंतर आरोपी जितेंद्रची वाट पाहत घरातच दबा धरुन बसले. जितेंद्र घरी येताच आरोपींनी त्याच्यावरही हल्लाबोल केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता आरोपीच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळली. पोलिसी दाखवताच आोरपीने गुन्हा कबुल केला.
यानंतर पोलिसांनी डॉग स्कॉडलाही पाचारण केले. डॉग स्कॉडने आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे शेतातून शोधून काढले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमी बालकावर आग्रा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.