लखनऊ : प्रेयसी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. लखनऊ पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या झोपेच्या गोळ्यांच्या सहाय्याने तरुणीच्या हत्येची उकल केली आहे. गुरुवारी सायरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरौना गावात एका तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अर्शद आणि मोहम्मद आवेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या झोपेच्या गोळ्यांवरुन पोलिसांनी सर्व मेडिकल स्टोर्सकडे चौकशी केली. यावेळी एका मेडिकल स्टोर्स मालकाने दिलेल्या माहितीवरुन आरोपीचा सुगावा लागला. तसेच पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यावेळी एका सीसीटीव्हीत दोन तरुण एका तरुणीसह ई-रिक्षातून सरौना गावाकडे जाता दिसले. फुटेजमधील व्यक्तीची ओळख एका मेडिकल स्टोअरच्या मालकाने केली.
सरौना गावातून परतत असताना त्याच तरुणांचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मात्र त्यात तरुणी बेपत्ता होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अर्शदचा शोध घेतला. अर्शदची चौकशी केली असता सदर मृतदेहाची ओळख पटली. सबा खान असे मयत तरुणीचे नाव आहे.
सबा आणि अर्शद गुडंबा येथील आदिलनगर येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. अर्शदच्या आई-वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध असल्याने अर्शद तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. मात्र सबा अर्शदवर लग्नासाठी दबाव टाकत होती. यातूनच त्याने सबाला मारण्याचा कट रचला आणि सरौना गावात जाताना तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर अर्शदने त्याचा साथीदार मोहम्मद आवेश याच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेह लायटरने जाळला.