रुडकी : आजकाल केवळ वैवाहिक संबंधांमध्येच नव्हे तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील तणाव निर्माण होवू लागला आहे. अशाच एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या वादातून एका निष्पाप मुलाला प्राण गमवावा लागला. आरोपीने रिलेशनशिपमध्ये प्रेयसीबरोबर झालेल्या वादाचा राग काढत तिच्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली. उत्तराखंडच्या रुडकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि नंतर दूर अंतरावर जाऊन ती सुटकेस फेकून दिली. सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा हा गुन्हेगारी प्रताप उघडकीस आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
लिव इन रिलेशनशिपमध्ये वारंवार भांडण होत होते. शनिवारी झालेल्या वादाला वैतागून प्रेयसी दर्गामध्ये गेली होती. दुसऱ्या दिवशी तेथून परतल्यानंतर तिला आपला 12 वर्षांचा मुलगा गायब असल्याचे आढळले.
सुरुवातीला मुलगा बाहेर कुठेतरी खेळत असेल, असा समज तिने केला. मात्र बराच वेळ होऊनही मुलगा न परतल्याने ती काळजीत सापडली आणि तिने शोधाशोध सुरू केली. विशेष म्हणजे आरोपी देखील तिच्यासोबत मुलाचा शोध घेत होता.
आरोपीने त्याचे नाटक प्रेयसीच्या मुळीच लक्षात येऊ दिले नाही. याचदरम्यान तिने घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे ठरवले. यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी प्रियकराचा प्रताप उघड झाला. त्यामुळे आरोपीचा बुरखा फाडला गेला.
प्रेयसीसोबत मुलाला शोधण्याचे नाटक करणाऱ्या प्रियकराचे पितळ सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड पडले. मागील नऊ वर्षांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच एवढा विश्वासघात केल्याने प्रेयसीच्या पायाखालची वाळूच सरकली.
कारनामा उघड होताच आरोपीने लगेच पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. मात्र हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. गंग नहर परिसरात मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.