विरार : पुणे नाशिकनंतर आता विरारमध्ये गावगुंडांनी हैदोस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्व फुलपाडा परिसरात पाच गुंडानी हैदोस घालत तीन जणांना लोखंडी रॉड, लाकडी, दांडे, दगडाने बेदम मारहाण करून, वॅग्नर कारची देखील तोडफोड केली आहे. विरार पूर्वेच्या फुलपाडा रिक्षा स्टॅन्ड पापडखिंडी डॅम येथे काल मध्यरात्री दारूच्या नशेत ही मारहाण केली आहे. मोहित झा, सुमित मिश्रा, राजा चौधरी अशी मारहाण झालेल्या जखमी तरुणांची नावे असून, मोहित झा याच्या मानेला, हाताला, पाठीवर, डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी फरार आहेत.
वारंवार तक्रार करून देखील पोलीस या गुंडांवर काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप जखमींनी केला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुलपाडा पापडखिंडी डॅम परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. मात्र त्याठिकाणी गुंडांकडून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. रस्त्याने येणारे जाणाऱ्या महिलांची छेड काढणे, परिसरातील लोकांना धमकावून दहशत पसरवण्याचे काम या गुंडांकडून होत आहे.
यामुळे नागरिक, विशेषतः महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून विरार पूर्व पापरखिंडी डॅम परिसरात बिट चौकी उभारण्यात यावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.