मुंबई : 25 वर्षीय इंडो-कॅनेडियन ब्युटीशियन जसविंदर कौर सिद्धू उर्फ जस्सी (Jaswinder Kaur “Jassi” Sidhu) हिची 8 जून 2000 रोजी हत्या करण्यात आली होती. ब्रिटिश कोलंबियाहून पंजाबला परतल्यानंतर लुधियानाच्या कौन्के आणि खोसा गावाजवळ तिचा जीव घेण्यात आला. मर्जीविरुद्ध केलेल्या लग्नाची शिक्षा म्हणून तिची आई मल्कीयत कौर सिद्धू आणि काका सुरजीत सिंग बादशा यांच्या आदेशाने तिचे अपहरण आणि छळ करुन हत्या करण्यात आली होती.
पंजाबमधील तरुणाशी प्रेमसंबंध
जसविंदर कौरचा जन्म आणि बालपण ब्रिटिश कोलंबियातील मेपल रिज येथे गेले. भारतातून कॅनडाला स्थायिक झालेल्या तिच्या श्रीमंत कुटुंबाचे प्रमुख तिचे काका सुरजीत सिंग बादशा होते. डिसेंबर 1994 मध्ये पंजाबमधील जगराव शहरात जस्सी सहकुटुंब आली असताना तिची भेट कबड्डीपटू सुखविंदर सिंग सिद्धू उर्फ मिठ्ठू याच्याशी झाली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी जस्सी जेमतेम 19 वर्षांची होती. मात्र पुढील चार वर्ष ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. 1999 मध्ये जस्सी पुन्हा आपल्या कुटुंबासह भारतात आली होती. त्यावेळी, तिचं लग्न ठरवणं, हाच कुटुंबाच्या दौऱ्याचा उद्देश होता.
गुरूद्वारामध्ये गुपचूप लग्न
सुखविंदरने दावा केला की तो झोपेच्या गोळ्या आणत असे आणि जस्सीच्या बाजूने असलेली तिची काकू रात्रीच्या जेवणात त्या मिसळत असे. प्रत्येक जण झोपी गेल्याची खात्री झाल्यानंतर सुखविंदर जस्सीला तिच्या खोलीत भेटायला जायचा. जस्सी आणि सुखविंदर यांनी 15 मार्च 1999 रोजी गुरूद्वारामध्ये गुपचूप लग्न केले. तिने तिच्या लग्नाविषयी आपल्या कुटुंबाला सांगितलं नव्हतं, मात्र ती सुखविंदरला पत्र लिहित असे आणि त्याला पैसेही पाठवत असे.
एकाच कुळातील असल्याने विरोध
एका वर्षानंतर, तिच्या कुटुंबीयांना भारतातील नातेवाईकांद्वारे या विवाहाविषयी समजलं. त्यांनी या लग्नाला जोरदार विरोध केला, कारण पती सुखविंदर हा जस्सीच्या आईच्या गावचा होता आणि त्याच सिद्धू कुळातील होता. पारंपारिक रिवाजानुसार जवळच्या नातेवाईकांमध्ये असं लग्न करणं निषिद्ध मानलं जात असे.
घटस्फोटासाठी दबाव
कुटुंबीयांनी तिला गाड्या आणि इतर गोष्टींचं आमिष दाखवून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिने न ऐकल्यामुळे त्यांची मजल जस्सीला मारहाण करेपर्यंतही गेली. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, सुखविंदरला कॅनडाला येण्यास मदत होईल, असं खोटं सांगून तिच्या कुटुंबाने तिला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला. प्रत्यक्षात सुखविंदरवर काही गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा जस्सीला हे समजलं, तेव्हा तिने भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, आणि हे आरोप खोटे असून आपल्याला त्याच्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेल्याचा दावा केला.
जस्सी कॅनडाहून भारतात पळून आली
जस्सी रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांच्या मदतीने घरातून पळून गेली. तिने विमानाचे तिकीट खरेदी करण्यासाठी मित्राकडून पैसे घेतले. सुखविंदरला पुन्हा भेटण्यासाठी 12 मे 2000 रोजी ती भारतात आली. 8 जून रोजी जस्सी आणि सुखविंदर यांचे तिच्या काकांनी भाड्याने घेतलेल्या गुंडांच्या मदतीने अपहरण केले. सुखविंदरला बेदम मारहाण करण्यात आली, तर जस्सीला एका बंद फार्महाऊसमध्ये नेण्यात आले, जिथे नंतर तिची हत्या करण्यात आली.
आई आणि काकांना हत्येनंतर अकरा वर्षांनी अटक
9 जून 2000 रोजी तिचा मृतदेह कांके खोसापासून 45 किमी अंतरावर सिंचन कालव्यात आढळला. तिचा गळा कापलेला होता. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की मारेकरी फोनद्वारे तिच्या आई आणि काकांच्या संपर्कात होते आणि जस्सीला मारण्याचा आदेश तिच्या आईने दिल्याचे स्पष्ट झाले. तिच्या आई आणि काकांना जस्सीच्या हत्येनंतर अकरा वर्षांनी म्हणजेच 6 जानेवारी 2012 रोजी अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
मैत्रिणीच्या भावांनी खून करुन मृतदेह जाळला, 2002 चे बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड
आमदार पित्यासह कुटुंबातील आठ जणांची हत्या, 2001 मधील गाजलेलं पुनिया हत्याकांड काय आहे?