पुणे / प्रदीप कापसे : स्विफ्ट कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुण्यात गाड्या चोरून परराज्यात नेऊन विकल्या जात होत्या. पुणे ग्रामीण पोलिसांनी चेन्नईत जाऊन चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राजा कल्याण सुंदराम, रविंद्रम गोपीनाथम, यादवराज शक्तीवेल, आर सुधाकरन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी सध्या शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
गेल्या चार महिन्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून स्विफ्ट डिझायर कार चोरी झाल्याचे एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात फक्त स्विफ्ट डिझायर कार चोरी जात असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करत प्रथमच चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्यांना चेन्नई येथून अटक केली. चोरी गेलेल्या स्विफ्ट डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत 30 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील चोरी गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे संभाजीनगर कडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले. गुप्त माहितीद्वारे चोरी गेलेली वाहने तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिरूर विभागाच्या तपास पथकाने चेन्नई येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेत, चोरीला गेलेल्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त केला.
अटक आरोपी आर सुधाकरन याच्याकडे चौकशी केली असता, मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून त्याच्यामार्फत तीन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत. आरोपी लॅपटॉपमधील सॉफ्टवेअर वापरून कार अनलॉक करून स्विफ्ट डिझायर कार चोरी करायचे.