मुंबई : महिलांना, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हेरून ते एटीएम सेंटरवर पाळत ठेवून असायचे. कोणाला पैसे काढून हवे असतील तर मदत करण्याच्या बहाण्याने ते पुढाकार घ्यायचे. आणि पिन नंबर विचारून कार्ड अचानक बदलून नंतर खात्यातून पैसे काढून पसार व्हायचे.
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली तसेच आजूबाजूच्या परीसरातील नागरीकांना लुबाडणाऱ्या एका आंतरराज्य एटीएम फ्रॉड करणाऱ्या टोळीचा भंडाफोड ठाणे खंडणी विरोधी पथकाने केला आहे. एका आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना पोलीसांना जेरबंद केले असून एकूण आठ केसेसचा छडा लावला आहे.
या टोळीचे सदस्य ज्यांना एटीएम सेंटरमधून पैसे काढता येत नाहीत, त्यांना हेरून मदत करण्याच्या बहाण्याने लुटायचे. त्यांच्याकडून एटीएमचा पिन नंबर घेऊन त्यांचे कार्ड बदलून ते पैसे काढून पळायचे. या प्रकरणात पोलीसांनी तिघांना पंढरपूरातून आणि एकाला उल्हासनगरातून अटक केली आहे. सनी मुन्ना सिंग, (28), श्रीकांत गोडबोले, (28), हरिदास मगरे, (25) आणि रामराव शिरसाट, (35) यांना पोलिसांनी 70,000 रोख आणि ₹4.06 लाख किमतीची वाहनांसह अटक केली आहे.
भिवंडी येथील रुपाली सतीश बोईरे (32) यांचे एटीएम कार्ड एका व्यक्तीने बदलून तिच्या खात्यातून 38,500 रुपये काढून घेतल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. आम्हाला गुप्त बातमीदारांकडून या आरोपींची माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचण्यात येऊन त्यांना अटक केल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि तक्रारदारांचे सर्व एटीएम कार्डही जप्त केले आहेत. आम्ही आरोपींकडून चोरीची 101 एटीएम कार्डेही जप्त केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.