नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ( Nashik Crime ) लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीये. नुकतीच चांदवड तालुक्यातील हिवरखेडे येथे नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाने ( ACB ) केलेल्या कारवाईत ग्रामीण भागात सर्रासपणे सुरू असलेला प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात ( Talathi Office ) जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी अनोख्या पद्धतीने लाच मागणे तलाठी कार्यालयातील खासगी कामगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. नाव लावून देतो म्हणून जेवणाचे बिल द्यावे लागेल असे सांगितले होते. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कारवाई केली आहे. रवींद्र कारभारी मोरे असं लचखोराचं नाव आहे.
तक्रारदार कांदा व्यापारी आहे. कांदा – खरेदी विक्रीचा ते व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी वडिलांच्या नावाने पन्नास गुंठे जमीन विकत घेतली होती. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावायचे होते.
त्यानुसार तक्रारदार याने तलाठी कार्यालयात जावून कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी मोबदल्यात काय देतो हॉटेलचे बिल डे असे फर्मान सोडले. त्यानुसार एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले.
तिथे पोटभरून जेवण केले. त्यानंतर बक्षीस म्हणून हॉटेलचे झालेले बिल द्यायला लावले. ही सर्व मागणी महिनाभरापूर्वी ठरली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हॉटेलला पार्टी झाली आणि त्याचे बिल द्यायला लावले.
त्यानुसार तक्रारदार याने अगोदर एसीबीकडे माहिती देऊन ठेवली होती. तक्रारदार याने दिलेल्या माहितीवरुन हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 2 हजार 940 रुपयांची लाच बक्षीस स्वरूपात स्वीकारल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली आहे. त्यामध्ये कुणी लाचेची मागणी केल्यास टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये लाचखोरीच्या घटना वाढल्या आहे. एसीबीच्या पोलीस अधिक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार घेतल्यानंतर कारवाईत वाढ झाली असून नागरिक तक्रारी करू लागले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.
मागील काही महिन्यात महावितरण विभागात वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना लाच घेतांना रंगेहाथ अटक केली होती. याशिवाय भूमीअभिलेख कार्यालयातील अधिक्षकही एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे लाचखोरीच्या घटना पाहता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.