नाशिक : जात पंचयातीचं भूत अद्यापही समाजातून गेलेले नाहीत. जात पंचायत विरोधी कायदा असतांनाही जात पंचायतीच्या घटना वारंवार समोर येत आहे. नाशिकच्या आदिवासी पाड्यावरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एप्रिल 2022 मध्ये एका अल्पवयीन मुलींचा अल्पवयीन मुलाशी विवाह लावून दिल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन विवाहित जिल्ह्या शासकीय रुग्णालायात बाळंतपणासाठी आल्यावर धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील एप्रिल 2022 मध्ये अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार होता. त्याची माहिती काही सामाजिक संघटनांना समजली होती. त्यानुसार अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह रोखण्यात आला होता, त्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी माघारी फिरताच रात्रीच्या वेळी जात पंचायतीच्या उपस्थित विवाह उरकून टाकण्यात आला होता.
रात्रीच्या वेळी जात पंचायतीने केलेल्या विवाहप्रसंगी अल्पवयीन मुलींकडून लेखी लिहून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुलीकडून लेखी लिहून घेतांना आंतरजातीय विवाह किंवा इतर कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही असे त्यामध्ये नमूद केल्याचे समोर आले आहे.
चार महीने विवाहाला उलटून गेल्यानंतर अल्पवयीन विवाहित माहेरी निघून गेली होती, मात्र ती त्यानंतर आलीच नाही, त्यानंतर तीच्याकडून स्टॅम्प पेपरवर घटस्फोट झाल्याचे सुद्धा लिहून घेतल्याचे समोर आले आहे.
यामध्ये मुलाला दूसरा विवाह केल्यास कुठलीही अडचण नसून मुलीने दूसरा विवाह केल्यास 51 हजार रुपयांचा दंड होईल असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर अद्यापही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. यापूर्वी देखील अनेक घटना समोर आलेल्या असतांना वारंवार या घटना समोर येत असल्याने कारवाईची मागणी होत आहे.
जात पंचायत मूठमातीचे कृष्णा चांदगुडे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या घटना रोखल्या जातील का ? ही बघणं महत्वाचे ठरणार आहे.