मुंबई : जुलै महिन्याच्या अखेरीस जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या (Jaipur-Mumbai Train Firing)घटनेने सर्वच हादरले होते. आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात चौघांचा मृत्यू (death) झाला होता. या हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपी चेतन सिंह याने ट्रेनमध्ये बसलेल्या एका बुरखा घातलेल्या महिलेला धमकी दिली आणि बंदूक रोखून तिला ‘जय माता दी’ म्हणायला लावले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे. 31 जुलै रोजी घडलेल्या या हत्याकांडामुळे सर्व प्रवासी भयभीत झाले होते.
एका रिपोर्टनुसार, पोलीसांच्या सूत्रांनी सांगितले की, Government Railway Police (GRP) बोरीवली, येथील पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी या महिलेची ओळख पटवली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिला प्रमुख साक्षीदार बनवण्यात आले आहे. हा संपूर्ण भाग ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, असे सूत्रांनी नमूद केले आहे. चेतन याने त्याचे वरिष्ठ टीकाराम मीणा आणि तीन प्रवासी – अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरवाला, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
महिला साक्षीदाराने काय सांगितले ?
रिपोर्ट्सनुसार, चेतन याने बी-5 कोचमध्ये टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने त्याच कोचमधील दुसऱ्या प्रवाशावरही गोळी चालवली. तर बी2 मधील पुढील प्रवाशाला पँट्रीमध्ये नेऊन गोळी मारली अन् अखेर एस-6मध्ये चौथ्या प्रवाशाला गोळी मारली. त्यानंतर तो पुढल्या डब्यात गेला, आणि बी-3 मध्ये बुरखा घातलेल्या महिला प्रवाशाला निशाणा बनवलं. त्या महिलेने नोंदवलेल्या जबाबानुसार, चेतनने तिच्यावर बंदूक रोखली आणि तिला ‘जय माता दी’ चा नारा लगावण्यास सांगितले. त्या महिलेने तसे केले असता, त्याने तिला तेच पुन्हा जोरात म्हणण्यास सांगितले.
चेतन सिंहचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये तो सांगत होता की, या लोकांना पाकिस्तानमधून ऑपरेट केलं जातंय. तसेच त्याने मीडियाचंही नाव घेतलं. त्याशिवाय भारतात रहायचं असेल तर मोदी आणि योगी यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही तो म्हणाला.या व्हिडिओतून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिसून येत आहे.