जळगाव | 13 सप्टेंबर 2023 : लेक आणि वडीलांच नातं अतिशय खास, प्रेमळ. पण याचा नात्यावरचा विश्वास उडून जाईल अशी धक्कादायक घटना घडली आहे. तेथे जन्मदात्या पित्यानेच त्याच्या तान्ह्या मुलीचं आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना (crime news) मंगळवारी जळगाव जवळ घडली आहे. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला (man killed daughter) तत्काळ अटक केली. अवघ्या ८ दिवसांच्या मुलीचा असा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळत आहे. गोकुळ जाधव (वय ३०) असे नराधम आरोपीचे नाव असल्याचे समजते.
वाकोड येथील हरिनगर तांडा येथे आरोपी गोकुळ जाधव, त्याची पत्नी आणि दोन मुलींसह रहात होता. त्याची पत्नी तिसऱ्या वेळी गरोदर होती. २ सप्टेंबर रोजी वाकोड प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती झाली. मात्र तिसऱ्या खेपेसही त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली. यामुळे संतापलेल्या गोकुळने १० सप्टेंबर रोजी तिचा जीव घेतला. अवघ्या ८ दिवसांच्या लेकीच्या तोंडात त्याने तंबाखू भरून तिला झोपवले. त्यातच तिचा मृत्यू झाला असे समते. मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आरोपीने दिली हत्येची कबुली
जाधव यांच्या घरी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली होती. मात्र तेव्हा मुलगी घरात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा त्या कर्मचारी महिलेने याप्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर डॉ. संदीप कुमावत हे वैद्यकीय अधिकारी मंगळवारी गावात पोहोचले आणि त्यांनी जाधव याच्याकडे मुलीबद्दल विचारपूस केली. तेव्हा आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे जाधव याने डॉक्टरांना सांगितले. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी जाधव याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. अवघ्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला पाळण्यात झोपवले , त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. तसेच फर्दापूर ते वाकोड या रस्त्यावर खड्डा खणून रात्रीच्या सुमारास त्यात लेकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक कबुलीही त्याने दिली. याप्रकरणी जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.