श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पूंछ जिल्ह्यातील सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल मित्राच्या घरी मृतावस्थेत सापडल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. राजौरीतील वॉर्ड क्रमांक आठमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. अपघात झाल्याचा खोटा बहाणा करुन संबंधित तरुण मित्राच्या घरी गेला होता, त्यानंतर आरामाच्या बहाण्याने त्याने तिथेच आपल्या आयुष्याची अखेर केली. इफ्तखार अहमद असं मयत पोलिसाचं नाव आहे. त्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शव विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. मात्र इफ्तखारच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इफ्तखार अहमद मेंढारमधील अडीचा रहिवासी होता. तो पूंछमधील जिल्हा पोलिस लाईन्समध्ये तैनात होता. राजौरी शहरातील रहिवासी संजय शर्मा याच्याशी इफ्तखारची घनिष्ठ मैत्री होती. संजयही पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल असून तो विजयपूर येथे प्रशिक्षण ड्युटीवर आहे. इफ्तखार अहमद राजोरी येथील संजयच्या घरी सतत येत असे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इफ्तखार गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास संजयच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी पोहोचला. काही काळ आराम करत असल्याचं त्याने संजयच्या कुटुंबीयांना सांगितलं. अपघातात आपल्याला किरकोळ दुखापत झाल्याचे त्याने सांगितलं. यानंतर संजयचा भाऊ अनिलने इफ्तखारला एका खोलीत आराम करण्यास सांगितले.
दुपारी एक वाजताच्या सुमारास संजयचा मुलगा शाळेतून आला. तो इफ्तखारच्या खोलीत गेला असता त्याला इफ्तखार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर अनिलने पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक दानिश दार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संजयच्या घरी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.
प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसते. मात्र सर्व बाजूंनी तपास करुन आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जाईल, असं एसएसपी मोहम्मद अस्लम यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपीएफ जवानाची आत्महत्या
आंब्याच्या झाडावर आयुष्याची अखेर, तलाठ्याची शेतात आत्महत्या, सकाळी पत्नीसमोर भयावह दृश्य
नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल