कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कल्याणमध्ये अशी एक चोरीची घटना घडली आहे, जिथे चोरट्यांनी देवांनाही सोडलं नाही. हो, हे खरं आहे. चोरट्यांनी चक्क देवळात जाऊन तेथेही चोरी केली. कल्याण पूर्व येथील पत्रीपुलापलिकडे रेल्वे समांतर रस्त्यावर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी काल दुपारी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्यात. हा सर्व प्रकार मंदिर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
नेमकं काय झालं ?
शुक्रवारी दुपारी पावणे दोन ते दोन वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले आहे. दुपारी मंदिर परिसर आणि मंदिरात कोणीही नसल्याची संधी साधत या दोघा चोरट्यांनी ही चोरी केली. दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा देवळात शिरला, त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला. आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धूम ठोकली. या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30 हजार रुपये इतकी आहे.संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे आढळले. त्याबाबत त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता, ही चोरी घडल्याचे दिसून आले. याप्रकरणातील चोरट्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.