सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 27 सप्टेंबर 2023 : दारूचा नाद लई वाईट गड्या ! दारू (alcohol) फक्त पिणाऱ्याचं शरीर खराब करत नाही तर त्याच्या डोक्याचं भुस्काट करते. एकदा ती चढली की त्या नशेत कोण काय करून बसेल याचा काहीच नेम नाही. त्यामुळे शहाण्या माणसाने दारूच्या नादी लागू नये असं म्हणतात. अशीच एक घटना कल्याण मध्ये घडली आहे. तिथे काही व्यक्तींनी बारमध्ये घुसून फ्री दारू (free alochol) मागितली. मात्र त्यास नकार मिळाल्यानंतर आरोपींनी राडा सुरू केला.
त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात करत कर्मचाऱ्यांना मारहाण (beat up cashier) केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कॅश काऊंटरमधील हजारो रुपयांची रक्कमही काढून घेतली आणि ते फरार झाले.याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्यया तर मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
का सुरू झाला वाद ?
कल्याण पश्चिम येथे डिव्हाईन फाईन डाईन नावाचे रेस्टॉरंट अँड बार आहे. 25 सप्टेंबर (सोमवारी) रोजी संध्याकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास तीन आरोपी बारमध्ये आले. बाहेरच्या कॅश काउंटर वरती काम करणाऱ्या,कॅशिअर सूरज चौपाल याच्याकडे त्यांनी फ्री दारूची मागणी केली. मात्र सूरज याने फुकट दारू देण्यास नकार दिला. यामुळे ते तिघे भडकले आणि त्यांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यांनी थेट तोडफोडच सुरू केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा सूरजशी बोलायला सुरूवात केली आणि फ्री दारू नाही तर बाहेर जाऊन दारू पिण्यासाठी तूच आम्हाला पैसे दे अशी विचित्र मागणीदेखील केली.
तो काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी त्याला धाक दाखवत त्याच्याकडील 12 हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली आणि तिघेही तेथून फरार झाले. यानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत सांगत तक्रार दाखल केली. त्यानंतर सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अशोक होनमाने, क्राईम पी आय प्रदीप पाटील यांनी पोलिसांची दोन पथकं तयार केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान या गुन्ह्यातील दोन आरोपी कल्याण मध्ये असल्याची माहिती पीएसआय आशिष भगत, तानाजी वाघ व पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी मनोहर चित्ते यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे या चौघांच्या पथकाने इंदिरानगर परिसरात सापळा रचत यापैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. सिद्धेश उर्फ भोप्या जाधव , रोहित कांगडा या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र एक सराईत आरोपी असलेल्या त्यांचा तिसरा साथीदार अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत . त्याच्यावर आठ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.