कल्याण | 6 ऑक्टोबर 2023 : आजकाल अनेक जण लिव्ह-इन रिलेशनमध्ये रहायला लागलं आहेत. एकमेकांवर प्रेम असेल, एकत्र रहायची इच्छा असेल पण लग्नाची कमिटमेंट नको तर बरेच जण लिव्ह-इनचा (live in relationship) पर्याय निवडताना दिसतात. पण सगळ्यांच्याच प्रेमाचा शेवट गोड होतो असं नाही. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे ‘अन् ते सुखीने राहू लागले… ‘ असा गोड शेवट सर्वांच्याच नशिबी येतोच असंही नाही.
काहींची स्टोरी मध्येच संपते, थांबते किंवा काहींच्या नशीबी अतिशय दु:खद शेवट येतो. कल्याणमध्ये एका स्टोरीचा असाच एक दु:खद आणि तितकाच हिंसक शेवट झाल्याचे समोर आले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकाने त्याच्या पार्टनरची हत्या (crime news) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये (crime in kalyan) घडल्याचे उघडकीस आलं आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली.
चारित्र्यावर संशय घेत झाला वाद
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरातील विजयनगर आमराई परिसरात आरोपी राहतो. विजय असे त्याचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. तो एका 38 वर्षीय महिलेसोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. मात्र गेल्या काही काळापासून त्या दोघांमध्ये खटके उडायचे, अनेकदा मोठ्याने भांडणंही व्हायची. आरोपी विजयचा त्याच्या पार्टनरच्या चारित्र्यावर संशय होता. याच मुद्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे.
घटनेच्या दिवशीही त्या दोघांचं जोरदार भांडण झालं होतं. संतापाच्या भरात आरोपी विजयने धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपी हा हत्येनंतर फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला आणि अवघ्या काही तासांतच त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
भिवंडीतही झाली होती हत्या
लिव्ह-इन रिलेशनशिपमधील पार्टनरचा जीव घेतल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात उघडकीस आल्या आहेत. गेल्या महिन्यातच भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे एका महिलेचा तिच्या प्रियकराने खून केला. यापूर्वी तिचा विवाह झाला होता, मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिच्या प्रियकरासोबतच ती घरात राहत होती. मात्र त्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जोर लावून दरवाजा उघडला असता त्या महिलेचा मृतदेह किचनमध्ये सापडला. तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला.