गर्लफ्रेंडसाठी करायचा दिवसाढवळ्या चोरी, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Aug 30, 2022 | 9:48 PM

आरोपीकडून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपाडा, आगरीपाडा, कळवा, मुंब्य्रासह इतर विविध पोलीस ठाण्यात एकूण 25 गुन्हे दाखल आहेत.

गर्लफ्रेंडसाठी करायचा दिवसाढवळ्या चोरी, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
कल्याणमध्ये सराईत चोरटा अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर शक्यतो रात्रीच्या वेळी बंद घरांना टार्गेट करतात. मात्र मौजमजा करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी एक तरुण दिवसाढवळ्या घरफोड्या करायचा. डोंबिवलीमध्येही या चोराने घरफोडी (Burglary) केली. मात्र तो सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाला. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्राँच करत होते. अखेर कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस विनोद चन्ने याच्या माहितीनंतर क्राईम बँचच्या टीमने मुंब्रा येथून या चोराला अटक (Arrest) केली आहे. आरोपीवर इतर पोलीस ठाण्यात एकूण 25 गुन्हे दाखल आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अब्ररार अकबर शेख असे अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ परिसरातील सोसायटीतील घरचे लॉक तोडून घरात असलेली तिजोरी घेऊन एक चोरटा पसार झाला होता. मात्र सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा दिसून आला. याचा आधार घेत पोलीसांनी तपास सुरू केला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

कल्याण गुन्हे शाखाचे पोलिस विनोद चन्ने यांना आरोपी मुंब्रा येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सापळा रचला. शेख याला मुंब्रा येथील भोलेनाथ नगरमधून अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल

आरोपीकडून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपाडा, आगरीपाडा, कळवा, मुंब्य्रासह इतर विविध पोलीस ठाण्यात एकूण 25 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु

अब्ररार हा दिवसाढवळ्या घरफोड्या करायचा. चोरी केलेल्या पैशातून मौजमजा करायचा. तसेच मैत्रिणीवर देखील पैसे उडवायचा अशी माहिती समोर आली आहे. कल्याण क्राईम ब्राँचने डोंबिवली पोलिसांना या चोराचा ताबा दिला असून अधिक चौकशी सुरू आहे. (Kalyan Crime Branch arrested thief who stole for girlfriend)