कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरांचा सुळसुळाट, क्राईम ब्रँचने ‘अशा’ आवळल्या मुसक्या

| Updated on: Oct 22, 2022 | 9:50 PM

चोरीच्या दुचाकी घेऊन विक्रीसाठी काही इसम कल्याण मलंगगड रोडला द्वारली गावातील गणपती मंदिराजवळ येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी मिळाली होती.

कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरांचा सुळसुळाट, क्राईम ब्रँचने अशा आवळल्या मुसक्या
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरांचा सुळसुळाट
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवलीत गाडी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटना पाहता कल्याण क्राईम ब्रँचने (Kalyan Crime Branch) गुन्हेगारांविरोधात कंबर कसली आहे. वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटनांचा तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना कल्याण पूर्वेतील द्वारली गावातून अटक केली (Accused Arrested) आहे. अटक आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे.

आरोपींकडून तीन दुचाकी जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रमजान इब्राहिम शेख असे 20 वर्षीय अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

या चोरट्यांनी कल्याणमधील कोळसेवाडी, विष्णुनगर, खडकपाडा, महात्मा फुले चौक या ठिकाणी उच्छाद मांडला होता. विष्णुनगर परिसरात एक दुचाकी चोरीला गेली होती. या दुचाकी चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी या चोरट्याची माहिती मिळाली.

गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला

चोरीच्या दुचाकी घेऊन विक्रीसाठी काही इसम कल्याण मलंगगड रोडला द्वारली गावातील गणपती मंदिराजवळ येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी गणपती मंदिराजवळ सापळा रचला.

यावेळी गणपती मंदिरासमोर दोघे इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. यावेळी साध्या वेशातील पोलिसाने आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडील दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चोरटे घाबरले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले.

मात्र पोलीस पथकाने शिताफीने दोघांना पकडले. पोलीस चौकशीत रमजानने तीन दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने विष्णुनगर आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात पाच दुचाकी चोरी केल्याची सांगितले.

अल्पवयीन चोराची बालसुधारगृहात रवानगी

या चोरीच्या घटनांमध्ये रमजान अल्पवयीन मुलाला साथीदार म्हणून घेतले होते. पोलिसांनी रमजानची कोठडीत रवानगी केली, तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले.