कल्याण | 2 डिसेंबर 2023 : दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरलं. एका बिझनेसमनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी बिझनेसमन घरातून फरार झाला आहे. दीपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने पत्वी अश्विनी आणि सात वर्षांच्या मुलाचे आयुष्य संपवले.
या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी दीपक गायकवाड याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान ही हत्या नेमकी का झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नातेवाईकांना केला एक कॉल, त्यानंतर घरात जे घडलं…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक गायकवाड हा पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता. त्यांचे कल्याण शहरातच नानूज वर्ल्ड नावाचे खेळण्यांचे दुकान आहे. काल दुपारी दीपक याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता. त्यांच्याशी बराच वेळ फोनवरून बोलणंही झालं. मात्र त्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून, दोघांची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळाने तो घटनास्थळावरून फरार झाला.
घरातील दृश्य पाहून नातेवाईक हादरले
फोन केल्यानंतर दीपकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांचे डोळेच विस्फारले, ते सगळेच हादरून गेले. घरामध्ये गायकवाड याची पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह होता. तर हत्येनंतर दीपक गायकवाड फरार झाला. हादरलेल्या नातेवाईकांनी कसाबसा धीर गोळा करत महात्मा फुले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले . पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
आरोपी दीपक गायकवाड याचे कल्याण शहरात नानूज वर्ल्ड हे महागड्या खेळण्यांचे दुकान आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल उचलून पत्नी आणि मुलाची हत्या का केली हे समजू शकलेले नाही. दीपकने असे का केले ? हे त्याच्या अटकेनंतरच समोर येईल. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र या हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.