कल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात ही टोळी खुलेआम शिरून गणपतीच्या मूर्तीसमोर नाचत, नजर चुकवत लाखोंचे दागिने लंपास करत आहे. विशेष म्हणजे दागिने पळवल्यावर ते घरच्यांकडून पैशांची मागणी देखील करत आहेत. असाच एक प्रकार कल्याणच्या वाडेघर परिसरात सुरेंद्र चंद्रकांत पाटील या व्यापाऱ्याच्या घरात घडला आहे. तृतीयपंथियाच्या टोळीने पाटील यांच्या घरात शिरून त्यांची पत्नी आणि आईचे तब्बल 15 तोळ्याचे 2,40,000 रुपये किमतीचे दोन सोन्याच्या गंठण लंपास केले. विशेष म्हणजे या टोळीने सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतरही दोन हजारांची मागणी केली.आणि पैसे रोख घेऊन बिनधास्तपणे ते घरातून बाहेर पडले. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
कल्याणच्या वाडेघर परिसरात 8 तारखेला साडेअकरा वाजता एक धक्कादायक घटना घडली. सुरेंद्र चंद्रकांत पाटील यांच्या घरात पाच तृतीयपंथी व्यक्तींनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पैसे मागण्याच्या बहाण्याने जबरदस्ती प्रवेश केला आणि मोठी चोरी केली. पाटील यांच्या आईने स्वतःच्या आणि सुनेच्या सोन्याच्या गंठणांची पिशवीत ठेवून गणपतीच्या बाजूला ठेवले होते. त्यानंतर, घरातील कचरा टाकण्यासाठी त्या बाहेर गेल्या, त्याचवेळी पाच तृतीयपंथी घरात घुसले. गणपतीच्या सणाचे कारण देत त्यांनी पाटील यांच्या घरात पैसे मागायला सुरुवात केली. त्या पाच जणांपैकी एकाने, संधीचा फायदा घेत सोफ्यावर ठेवलेली पिशवी उचलून 15 तोळ्याच्या सोन्याच्या दोन गंठणांची चोरी केली, ज्याची किंमत सुमारे 2,40,000 रुपये आहे. इतकेच नव्हे, या तृतीयपंथींनी घरच्यांकडून 2000 रुपयांची मागणी केली आणि अखेर 200 रुपये घेऊन सर्वांसमोरच पळ काढला.थोड्या वेळात चोरी झाल्याचे घरच्यांच्या लक्षात आले, आणि त्यांनी तत्काळ कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या खडकपाडा पोलीस या पाचही तृतीयपंथी व्यक्तींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घेत आहेत.
बोरिवली पश्चिम येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकूने हल्ला
बोरिवली पश्चिम येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. काल रात्री गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरिवली पश्चिम येथील नंदनवन सोसायटीजवळ गणपती विसर्जनासाठी जात असताना भांडण झाले आणि एका व्यक्तीने गणपती मंडळाच्या दोन जणांवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर गणपती मंडळाच्या लोकांनी तक्रार देण्यासाठी MHB पोलिस स्टेशन गाठले.
सध्या बोरिवली पश्चिम एमएचबी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.