सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 3 नोव्हेंबर 2023 : कल्याण शहरातील मानाची वास्तू असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे महत्वाचे सर्वांनाच माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. दुर्गाडी किल्ला हा त्यापैकीच एक. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे.
मात्र याच कल्याण शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवरायांच्या काळातील या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बनावट पेपर करून ती जागा नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बनावट पेपर तयार करून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकेड निवेदन देण्यात आले होते. दस्तावेज तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटर व स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज आढळून आल्याने अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.
तहसीलदार कार्यालयातील प्रीती घोडे यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या आला आहे. सुयश शिर्के हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.